मतभेद विसरुन कामाला लागा : अजित पवार

उरण : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ मतदारसंघात आपला उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचा असेल तर सर्वांनी मतभेद विसरुन आता कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उरण येथे आयोजीत सभेत कार्यकर्त्यांना केले.

मावळ मतदारसंघामध्ये भाजपा- शिवसेनेचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे. आपल्यात असणारे मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने या निवडणूकीत काम करावे लागणार आहे, असे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या वेळी सभेला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप,  आमदार बाळाराम पाटील व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कर्जत येथे काल मंगळवारी संध्याकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, सर्वांना विश्वासात घेण्यात येईल आणि मागच्या काळात झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची ग्वाही देत पार्थ पवार यांना निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले होते. यावर कॉंग्रेसने प्रतिसाद देत मदत करण्याचा शब्द दिला.