मी कडवट शिवसैनिक दगा फटका करणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा धर्म समजून सांगितला म्हणून मी माघार घेत आहे. मी कडवट शिवसैनिक आहे दगा फटका करणार नाही. असे म्हणत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरेंचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल. मी कडवट शिवसैनिक आहे दगाफटका करणार नाही. युतीने माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती पार पाडेल. औरंगाबादमध्ये आज शिवसेना-भाजपाचा संयुक्त मेळावा सुरू झाला आहे. आजपासून युतीच्या कामाला लागणार आहे. रावसाहेब तुम्ही राज्यभर फिरा, मी आणि पंकजा मुंडे दोघे तुमच्यासाठी जालना मतदारसंघात प्रचार करू. जालन्यात युतीचा भगवा फडकवू . असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हंटले आहे.

विशेष म्हणजे, अर्जुन खोतकर यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचे जाहीर केल्या नंतर, भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माझा आणि अर्जुन खोतकर यांच्यातला संघर्ष वैयक्तिक नव्हता. असे प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हंटले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याचदरम्यान आज शिवसेना भाजप युतीचा दुसरा मेळावा औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्याच्या आधी जालन्याच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी रामा हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक पार पडली. या बठकीत हा तिढा सुटला आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा रिंगणातून माघार घेतली आहे.