पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार असल्याचे भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी सांगितले. जर कोणताही उमेदवार मिळाला नाही तर मी स्वत: निवडणूक लढवणार आहे. एका मुलाखतीमध्ये चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली.

चंद्रशेखर आणि भीम आर्मीतर्फे १५ मार्चला दिल्लीमध्ये शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. १५ मार्चला बहुजन हुंकार रॅली होणार असून या ठिकाणी जनतेचा आवाज देशाला ऐकायला मिळेल असेही चंद्रशेखर यांनी सांगितले. तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी हा आवाज आता दबणार नाही असेही चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.

चंद्रशेखर यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निषाणा साधला. आदित्यनाथ यांच्या इशाऱ्यावरच देवबंध येथील आपली पदयात्रा रोखण्यात आली. असा आरोप त्यांनी योगींवर केला. आमच्याकडे पदयात्रेची परवानगी होती. पण प्रशासन आणि सरकार याबद्दल अफवा पसरवत आहेत. बुधवारी पोलिसांनी कलम १४४ अंतर्गत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी प्रकृती बिघडल्याने त्यांना मेरठ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.