#Loksabha : भाजप कापणार ‘या’ सर्वात जुन्या ज्येष्ठ नेत्याचे तिकीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणूकीत मोठे पक्ष आता उमेदवारांची यादी जाहीर करण्याला प्राधान्य देत आहेत. भाजपच्या उमेदवार यादीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गांधीनगर येथील जागेसाठी भाजपकडून ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे तिकीट कापण्याची शक्यता असून त्यांच्याऐवजी अमित शहा यांना या ठिकाणाहून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

शनिवारी रात्री उशिरापर्य़ंत चाललेल्या भाजपच्या बैठकीमध्ये याविषयी प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपच्या प्रदेश कमिटीकडून अडवाणी यांच्याऐवजी अमित शहा यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह पक्षनिरीक्षकांकडे करण्यात आला आहे. अडवाणी यांचा मागील काही दिवसांमधील राजकीय वावर पाहता ते राजकारणातून निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणारे अडवानी संसदेत फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे परिस्थिती पाहता भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी ही मागणी केल्याचे समजतेय. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर पक्ष काय निर्णय घेणार याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, गांधीनगरमधून सहा वेळा खासदार पदी निवडून आलेल्या अडवाणी यांच्या उमेदवारीविषयी मांडण्यात आलेल्या या प्रस्तावावर भाजपाची संसदीय समिती अंतिम निर्णय घेणार आहे. सध्या या मुद्द्यावर खुद्द अडवाणींकडूनही कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. पण, राजकीय वर्तुळातील ही एक मोठी घडामोड असून, अडवाणींच्या राजकीय कारकिर्दीचा हा समारोप तर नाही? असा प्रश्न अडवाणी समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे.