मतदानावेळी बॉम्ब स्फोट, पोलीस गंभीर जखमी

राजनंदगाव (छत्तीसगड) : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असतानाच आज पुन्हा छत्तीसगडमधील राजनंदगाव जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. यामध्ये इंडो तिबेटन सीमा पोलीस दलातील कॉन्स्टेबल मन सिंह जखमी झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आयईडी स्फोटाची घटना मनपूर-मोहला विधानसभा मतदारसंघातील मेघा आणि दब्बा गावाजवळ ही घटना घडली आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणण्यात आला तेथून जवळच्या अंतरावर सुरक्षा रक्षक तैनात होते. मनपूर-मोहला भागात सकाळी सात  त दुपारी तीन यावेळेत मतदान होत होते. तर राजनंदगाव जिल्ह्यात अन्य ठिकाणी सकाळी सात ते सांयकाळी पाच या वेळेत मतदान होत आहे. राजनंदगाव मतदारसंघात सुमारे ६० हजार सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील धनिकारका येथील जंगलात आज पहाटे जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी) आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यात २ नक्षली ठार झाले आहेत.