काँग्रेसची ७२ हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा : देवेंद्र फडणवीस

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गरीबांसाठी ७२ हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा आहे. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील आयोजित जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याच दरम्यान, विरोधकांनी केलेली आघाडी,  आघाडी नसून महाखिचडी आहे. यांनी ५५ वर्ष राज्य केले, भष्टाचार, घोटाळे केले या महाखिचडीच्या नेत्यांच्या भाषणात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावं घेत आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले. याचबरोबर, काँग्रेस गरिबांना ७२ हजार देणार असे म्हणत आहेत. हे कुठून देणार? कोणाला देणार? याची काही माहिती नाही. आणि विशेष म्हणजे ७२ हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आता देशाला तुमची गरज नाही, देशाला मोदी आहेत. राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे मनोरंजना सारखे आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नका. देशाला खिळखिळी करण्याचे काम काही लोक करत आहेत. असा आरोपही त्यांनी केला. तसेच, आमच्या देशाच्या लष्करात ताकत आहे, पण राजकीय लोक यांना परवानगी देत नव्हते आणि बॉम्ब पडत होते. परंतु मोदींनी पाकिस्तानात घुसून कारवाई केली. आम्ही हल्ला केला याचे पुरावे काय आहेत, असे विरोधक आम्हाला विचारतात. जर आधी माहित असते तर यांचा नेता रॉकेट बरोबर सोडला असता. आता चर्चा करणारे सरकार नाही ठोकणारे सरकार आहे. असेही त्यांनी म्हंटले.