आघाडीच्या 3 जागांचा तिढा कायम, नगरमध्ये सुजय विखे उमेदवारीसाठी आग्रही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून मोदी सरकारला नमवण्यासाठी आघा़डी केली आहे. त्यासाठी सहा जागांचा तिढा होता. त्यातील तीन जागांचा तिढा सुटला असुन तीन जागेंचा तिढा कायम आहे. नंदुरबार, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जागेंचा समावेश आहे.

अहमदनगरची जागा मिळवण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. राधाकृष्ण विखे- पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे नगरमधून लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सुजय काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नंदुरबारची जागेची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. तर काँग्रेससाठी राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. याबदल्यात काँग्रेस कोट्यातली औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोपवण्यास दोन्ही पक्षात सहमती झाल्याची माहिती मिळाली आहे.

असं झालंच तर अहमदनगरमध्ये काँग्रेसकडून सुजय विखे पाटील, तर औरंगाबादमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.दरम्यान, रत्नागिरी आणि पुण्याची जागा काँग्रेसकडे राहणार  आहे. याबाबत 15 जानेवारीला दिल्लीत आघाडी नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. त्यावेळी नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबादच्या जागेवर शिक्कामोर्तब होईल.