काँग्रेस कार्यकारिणीच्या नकारानंतरही राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

प्रतिकूल परिस्थिती राहुल गांधींच्या नेतृत्वाची पक्षाला गरज : कार्यकारिणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या(CWC) बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला परंतु राहुल गांधींचा हा राजीनामा कार्यकारिणी समितीने फेटाळून लावला. कार्यकारिणी समितीने राजीनामा फेटाळल्या नंतर देखील राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम आहेत. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांवर म्हणाले की, हा राहुल गांधी यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. राहुल गांधी राजीनामा देण्याचा विचार रद्द करतील याची शक्यता कमी आहे.पक्षाच्या प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची आणि मार्गदर्शनाची जास्त गरज आहे, असे काँग्रेस कार्यकारिणी समितीचे मत आहे.

काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गुलाब नबी आझाद म्हणाले की, राहुल गांधी यांचे चांगले काम आहे. पक्षाच्या कठीण काळात काँग्रेस पक्षाचे कोणी जर नेतृत्व करू शकत असेल तर ते फक्त राहुल गांधी आहेत. विरोधकांच नेतृत्व करण्यासाठी देखील राहुल गांधीच योग्य आहेत.

समितीच्या निर्णयावर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेस कार्यकारिणी समिती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील जनादेशाचा विनम्रतापूर्वक स्वीकार करत आहे. काँग्रेस कार्यकारिणी समिती १२. १३ कोटी साहसी आणि जागरूक मतदारांचे, ज्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवला त्यांचे आभार मानते. काँग्रेस पक्षाच्या दारुण झालेल्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष चिंतन करत आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा दिलाच तर काँग्रेस पक्षाचे उत्तम पद्धतीने नेतृत्व करेल असा नेताही पक्षात आढळून येत नाही. त्यामुळे राहुल गांधी अध्यक्षपद सोडणार की नाही यांकडे सर्वांचे लक्ष लागले.