युवासेना ‘या’ भाजप महिला खासदाराचा प्रचार करणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना भाजपची युती झाली असली तरी एका गोष्टीवरून युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र भाजपच्या खासदाराविषयी नाराजी आहे. उत्तर मध्य मुंबईच्या भाजपच्या उमेदवार खासदार पूनम महाजन यांच्यावर मुंबईत युवासेना नाराज आहे. ही नाराजी एवढी वाढली आहे की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार पूनम महाजन यांचा प्रचार करणार नाही असा पवित्रा मुंबईत युवासेनेने घेतला आहे.

नक्की काय आहे प्रकरण
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार पूनम महाजन ह्या उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार आहेत. पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवासेना नाराज आहे. ‘ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देशाचे युथ आयकॉन आहेत. त्यांचा फोटो बॅनरवर न लावणे हा आम्हा शिवसैनिकांचा अपमान आहे. त्यामुळे या वृत्तीचा जाहीर निषेध करीत आहोत. पूनम महाजन जोपर्यंत चूक मान्य करीत नाहीत तोपर्यंत भाजपचा प्रचार करणार नाही असा निर्धार युवासेनेने केला आहे.’ तसेच पूनम महाजन यांचा निषेध करण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजता युवासैनिक वांद्र्यातील शाखेत एकवटणार आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे खासदार पूनम महाजन चर्चेत आल्या होत्या. मुंबईत सोमय्या मैदानावर आयोजित भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभ प्रसंगी बोलताना पूनम महाजन म्हणाल्या होत्या की , ‘शरद पवार हे रामायणातील मंथरा, तर महाभारतातील शकुनी मामा आहेत. सगळ्यांचं ऐकल्याचं दाखवून शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरु करणारे शरद पवारही या महाआघाडीत आहेत. स्वत:ला मिळालं नाही, की इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करणाऱ्या मंथरा आणि शकुनीसारखी पवारांची अवस्था आहे. असे हे सगळे मिळून मोदींच्या विकासरथाला अडवू पाहत आहेत. परंतु महाआघाडीच्या दलदलीत भाजपचं कमळच उमलेल’ असा विश्वास पूनम महाजन यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता युवासेनेने पूनम महाजन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.