पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ : बारणे आणि जगताप यांच्यात मनोमिलन

मावळ : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात दिलजमाई करण्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सोमवारी यश आले. लोकसभेच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये तीव्र मतभेद होते. बारणे आणि जगताप यांच्यात मनोमिलन झाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

निवडणूक तारखा जाहीर झाल्यापासून आमदार जगताप यांची शिवसेनेकडून मनधरणी चालू होती. बारणे यांच्या विजयासाठी जगताप यांनी प्रचारात सहभागी होणे गरजेचे असल्याने बारणे यांनी जगताप यांची भेट घेतली होती. मात्र तरी ते प्राचारात सक्रिय झाले नव्हते. त्यानंतर संजय राऊत यांनीही त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न केले मात्र त्याला देखील यश आले नव्हते. शेवटी जगताप यांचे मन वळवण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यात त्यांना यश आले. त्यामुळे महायुतीला मावळात मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत पिंपरी शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरवरुन गिरीश महाजन खास जगताप यांची भेट घेण्यासाठी आले होते. जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील बंगल्यावर सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत महाजन यांनी मतदार संघाचे प्रचाराचा आढावा घेतला तसेच मावळ मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर आली असल्याचे सांगितले. मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे त्यादृष्टीने येथील मतदार संघात सक्रिय होण्यास महाजन यांनी जगताप यांना सांगितले.

बारणे आणि जगताप वाद
मावळमध्ये पार्थ पवारांविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे रणांगणात आहेत. मात्र श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला लक्ष्मण जगताप यांचा विरोध आहे. स्वत: लक्ष्मण जगताप मावळमधून लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी शेवटपर्यंत मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी प्रयत्न केला. पण ही जागा शिवसेनेकडे असल्याने श्रीरंग बारणे यांनाच तिकीट मिळालं. लक्ष्मण जगताप यांच्या सहकाऱ्यांनी श्रीरंग बारणे यांच्याविरोधात काम करण्याचा इशारा दिला होता. जगताप राष्ट्रवादीत असताना बारणे काँग्रेसमध्ये होते. कालांतराने बारणे शिवसेनेत गेले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा दोघे आमने-सामने आले होते. जगताप यांनी अपक्ष तर बारणे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी जगताप यांनी बारणे यांचा पराभव केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचा श्रीरंग बारणेंनी पराभव केला होता.

Loading...
You might also like