Loksabha : ‘या’ आहेत पश्चिम महाराष्ट्रातील लक्षवेधी लढती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर अनेकांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. यंदाची लोकसभा निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील काही लढती या लक्षवेधी ठरणार आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळमधून अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. तर शिरुर मतदार संघातून छत्रपती संभाजीराजे यांची भूमीका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवल्याने पश्चिम महाराष्ट्रात अनेक लक्षवेधी लढती होत आहेत.

नगरमधून भाजपने डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिल्याने या ठिकाणची लढत खास लक्षवेधी ठरणार आहे. कारण विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच या ठिकाणाहून निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. २०१४ च्या निवडणूकीत कोल्हापूर, सातारा, बारामती आणि माढा या मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभेबरोबर विधानसभेच्या जागा वाढविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे भाजपमधील ‘इनकमिंग’ मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक वाढविल्याचे चित्र दिसत आहे.

पवार कुटुंबातील दोनजण लोकसभेच्या रिंगणात आहेत. मावळमधून पार्थ पवार तर बारामतीमधून सुप्रिया सुळे हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत. तर मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन माढा लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे सध्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांनी भाजपने ऑफर दिल्यास माढा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सातारा लोकसभा मतदार संघातून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला आव्हान देण्यासाठी युतीने कोल्हापूरमध्ये आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. पवार कुटुंबीयांना मावळ आणि बारामती मतदारसंघात अडकवून ठेवण्याची व्यूहरचना भाजपकडून केली जात आहे. यासाठी भाजपने बारामती मतदारसंघातून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. कांचन कुल यांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादीला आपल्या बालेकिल्ल्याकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. तर राष्ट्रवादीकडून बारामती मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न होत आहे.