माढ्यात R मोहिते VS D मोहिते सामना रंगणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माढ्यात लोकसभा निवडणुकीचे रोज नवे रूप पाहण्यास मिळू लागले आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे R मोहिते VS D मोहिते अशी लढत झाल्यास लोकसभा निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे.

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील सध्या शिवसेनेत आहेत. मात्र त्यांनी शरद पवार यांची मुंबई मध्ये भेट घेतली आहे. या भेटीत त्यांची शरद पवार यांच्या सोबत तब्बल एक तास बंद दारा आड चर्चा झाली आहे. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा सुगावा कोणालाही लागला नाही. त्यामुळे धवलसिंह राष्ट्रवादीत आल्यास मोहिते पाटील यांचा जो पारंपरिक मतदार आहे त्यात फूट पडण्याची शक्यता आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी मंत्री दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. माळशिरस तालुक्यात आणि सोलापूर जिल्हात त्यांनी जनसेवा संघटनेच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी संघटित केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे रणजितसिंह मोहिते पाटील यांना कडवी लढत देण्याचे सामर्थ आहे. म्हणून त्यांना गळाला लावण्याचा राष्ट्रवादी प्रयत्न करत आहे.

राष्ट्रवादीचे निष्ठावान असणारे मोहिते पाटील राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपच्या गोटात डेरे दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीची मानहानी झाली आहे. त्या मानहानीला रोखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आम्ही विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी देणार होतो असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणले आहे. परंतु राष्ट्रवादीला माढ्याची जागा विजयसिंहांना द्यायची होती तर मग पक्षश्रेष्ठींनी पहिल्या अथवा दुसऱ्या यादीत माढ्याची उमेदवारी का जाहीर केली नाही हा देखील मोठा प्रश्न उभा राहतो. तसेच आता राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख यांचे देखील नाव चर्चेत येते आहे. प्रभाकर देशुमख यांना उमेदवारी मिळाली तर रणजितसिंह मोहिते पाटील यांची निवडून येण्याची शक्यता अधिक आहे असा कयास राजकीय जाणकारांनी बांधला आहे. त्यामुळे शरद पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केल्या पासून ते माघारी घेण्यापर्यंत गाजणारा लोकसभा मतदारसंघ आता लोकसभेचा निकाल लगेपर्यंत चर्चेत राहण्याची शक्यता आहे.