उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ; ‘या’ आहेत मुख्य लढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या टप्प्यात उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती या मतदारसंघात निवडणूक होत आहे. सोलापूर बीड आणि नांदेड येथील प्रमुख उमेदवारांनी कालच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दुसऱ्या टप्प्यासाठी १८ एप्रिल २०१९ या दिवशी मतदान पार पडणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २९ मार्च ही आहे. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर तिकडे नांदेडमध्ये भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्यात मुख्य लढत होणार आहे. बीडमध्ये प्रीतम मुंडे (भाजप) विरुद्ध बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी ) असा मुख्य सामना रंगणार आहे.

परभणीमध्ये विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव विरुद्ध राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा सामना होणार आहे. तर तिकडे बुलडाणा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव लढत देणार आहेत. तर २०१४च्या लोकसभा निवडणूकीत आरोपप्रत्यारोपाच्या राजकारणात गाजलेला मतदारसंघ अमरावती, तेथे मागील वेळेची लढत पुन्हा पाहण्यास मिळणार आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात नवनीत कौर राणा या निवडणूकीच्या आखाड्यात असणार आहेत. मागील निवडणूकीच्या वेळी आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्रावर न्यायालयात जाऊन आक्षेप घेतल्याने ही निवडणूक गाजली होती.

उस्मानाबादमध्ये जुन्या राजकीय वैराला नव्याने उजाळा मिळण्याची शक्यता आहे. कारण येथे दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र माजी आमदार ओमराजे निंबाळकर (शिवसेना) यांच्या विरोधात पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजीतसिंह पाटील (राष्ट्रवादी) निवडणूक लढत आहेत. महाराष्ट्रात रंगणाऱ्या अशा लोकसभा लढतीमुळे आगामी काळात निवडणूकीतील मोठी चुरस पाहण्यास मिळणार आहे.