महाआघाडीच्या नेत्यांकडून पुन्हा ईव्हीएम प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. निवडणुकीबरोबरच ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह संयुक्त महाआघाडीच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आपचे खासदार संजय सिंह, माकपचे महेंद्र सिंग, तृणमूल काँग्रेसचे खासदार नझमुल हक, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, खुर्रम ओमर उपस्थित होते.

‘ईव्हीएम’मध्ये फेरफार हा चिंतेचा विषय –
ईव्हीएमबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की , ‘नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेतून जावं, ही जनभावना असली तरी ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार हाच खरा चिंतेचा विषय आहे. मी अनेक मतदारसंघांत फिरलो. लोकांचे मत सरकारविरोधी आहे. पण ईव्हीएम हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो किंवा ‘ईव्हीएम’मध्ये गडबड केली जाऊ शकते, असे माझे मत आहे.’

तंत्रज्ञान वापरून ईव्हीएम सहज हॅक केले जाऊ शकते –
ईव्हीएम’वर कुठूनही नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं, असा दावा या पत्रकार परिषदेत करताना चंद्राबाबू नायडू म्हणाले की , ‘ माझ्याकडे याबाबत पुरावे नसले तरी मोठी रक्कम मोजल्यास तुम्हाला हॅकरकडून विजयाची खात्री दिली जाते, अशी चर्चा आहे. तंत्रज्ञान वापरून ईव्हीएम सहज हॅक केले जाऊ शकते, अशी माहितीही माझ्या कानावर आली आहे.’

यापूर्वीही ईव्हीएमवर विरोधी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आले होते. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करुन निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह २१ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करण्यात आले होते. तसेच निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चंद्राबाबू नायडू यांनी ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन ईव्हीएमबाबत तक्रार केली होती.