राज यांच्या सभांचा खर्च मागण्याचा अधिकार नाही : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध भागात प्रचार सभा घेतल्या. या प्रचार सभांमधून त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. तसेच हे सरकार सत्तेत येऊ देऊ नका अशी हाक जनतेला दिली. राज ठाकरे यांच्या सभांच्या खर्चावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सभांच्या खर्चाचा तपशील मागवला आहे. या सभांबाबत राज ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठराखण केली आहे.

एखाद्या पक्षाने उमेदवार उभा न करता सभा घेतल्या तर तो त्याचा लोकशाहीचा अधिकार असल्याचे सांगत निवडणूक आयोगाला राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च मागण्याचा अधिकार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मनसेने लोकसभा निवडणूकीत उमेदवार न दिल्याने निवडणूक आयोगाला राज ठाकरे यांना सभांचा हिशोब मागण्याचा अधिकार नाही. एखाद्या पक्षाने उमेदवार न देता घेतलेली सभा त्याचा लोकशाहीचा अधिकार आहे. १९७७ मध्ये आणिबाणीविरोधात पु.ल. देशपांडे यांनी काँग्रेसविरोधात राज्यभर सभा घेतल्या होत्या. त्यावेळी आयोगाने हिशोब नाही मागितला. सभा घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यामुळे सभांचा खर्च निवडणूक आयोगाला मागण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च मनसे पक्षाच्या खर्चात गृहीत धऱला जाईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच या खर्चाचा तपशीलही मनसेला आयोगाला सादर करावा लागेल अशी माहिती निवडणूक आयोगाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिली आहे.