अभिनंदनला सोडले तर कुलभूषणला का नाही सोडले, ५६ इंचाची छाती गेली कुठं ?

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. देशाच्या जवानांवर हल्ला केला गेला तेव्हा देश आपल्या सैनिकांच्या पाठीमागे उभा राहिला. कुणीही राजकारण केलं नाही, मात्र, मोदींनीच याचं राजकारण केलं. अभिनंदन यांची सुटका जगाच्या दबावाने झाली. अभिनंदनला सोडले मग कुलभूषणला का नाही सोडले, ५६ इंचाचा छाती गेली कुठं गेली? अभिनंदनची सुटका करून भाजपवाले मढ्यावरचं लोणी खायचं काम करतायत, असा आरोप पवारांनी केला. परभणी येथे एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘ना खाउंगा ना खाने दुगा’ म्हणणाऱ्या मोदींनी अनिल अंबानींच्या रिलायन्ससाठी ३५० कोटींचे विमान १६६० कोटींना विकत घेण्याचं काम केलं. मोदींनी देशाच्या कंपनीऐवजी अंबानीच्या कंपनीला राफेलचं कंत्राट दिलं. ज्यांनी कधी खेळण्यातलं विमान बनवलं नाही, त्यांना राफेलचं कंत्राट दिलं कसं, असा सवाल पवारांनी यावेळी विचारला. तसेच याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही. राफेलची चौकशी झाली तर सगळे जेलमध्ये जातील, म्हणून हे सर्व गुप्त ठेवलं जात आहे ‘, असा आरोप शरद पवारांनी यावेळी केला.

मोदी सरकारने गेल्या पाच महिन्यात जी आश्वासने दिली ती पूर्ण झालेली नाहीत. युवकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं होतं. मात्र, देशातील बेरोजगार तरुणांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली आहे. त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकवायचा असेल तर युवकांनी लढा दिला पाहिजे, असं आवाहन शरद पवारांनी यावेळी केलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, नोटबंदी, जीएसटी, राफेल अशा विविध मुद्द्यांवर शरद पवारांनी मोदींना आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं.

मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं

बळीराजाला संकटात टाकण्याचे काम सरकारने केले. आमच्या काळात शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू आम्ही पुसले होते. आम्ही शेतकरी आत्महत्या थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र, मोदी साहेबांच्या सरकारमध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. मिमिक्री करत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. नोटबंदी, जीएसटीने सामान्यांसह व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. नोटबंदीनंतर परत आणलेला काळा पैसा तर कुठे जिरला हे मोदींनाच माहित आहे. नोटबंदीनंतर १५ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हे कर्तृत्व भाजप सरकारचं आहे, अशी टीका करत सत्तेचा गैरवापर करणाऱ्या या सरकारला खाली खेचा असं पवारांनी म्हटलं.