शिराळ चिंचोडी येथील फेरमतदानाची मागणी फेटाळली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथील मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी व केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक युवराज नरसिंहन यांनी आज फेटाळून लावली आहे. काही ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या फेरमतदान घेता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यासाठी मंगळवारी (दि.23) झालेल्या मतदानावेळी नगर दक्षिण मतदारसंघातील शिराळ चिचोंडी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन नादुरुस्त झाल्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले. येथील 197 व 198 या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिनमध्ये दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बिघाड झाल्या. पर्यायी ईव्हीएम मशिन सायंकाळी 5.45 मिनिटांनी दाखल झाल्या. त्याची अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नसल्याने या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्यावतीने त्यांचे प्रतिनिधी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी निवडणूक

निर्णय अधिका-यांकडे केली होती. या निवेदनावर आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी व केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक युवराज नरसिंहन यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी मतदान अधिका-यांनी मतदान केंद्रावर केलेले चित्रीकरण सादर केले. यामध्ये काही नागरिकांनी मुलाखती देताना मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे म्हटले आहे. मतदान यंत्र बिघडल्याने नागरिकांनी संतापून हा बहिष्कार टाकल्याचा युक्तीवाद ऍड. प्रसन्ना जोशी यांनी केला. काही मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला असेल, तर तांत्रिक दृष्टीकोनातून फेरमतदान घेता येतनसल्याचे सांगत फेरमतदानाची ही मागणी फेटाळण्यात आली आहे.