नितीन गडकरी ‘रिजेक्टेड’ ; वाचा नक्की काय आहे प्रकरण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात मतदान सुरु आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघ हा देशातील राजकारणात सर्वाधिक चर्चिला जाणाऱ्या मतदारसंघापैकी एक आहे. नागपुरातील न्यू इंग्लिश स्कूलमधल्या मतदार केंद्रावर उमेदवार यादीवरच शिक्के मारण्यात आले होते. त्यामध्ये चक्क केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’ असा शिक्का मारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी, यासाठी मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची यादी लावली जाते. मात्र या यादीवर गडकरींच्या फोटो आणि नावापुढे ‘रिजेक्टेड’ असे शिक्के मारण्यात आले होते. हे शिक्के कुणी मारले हे अद्याप अस्पष्ट आहे.

गडकरी विरुद्ध पटोले सामना –

नागपूर लोकसभा मतदारसंघ हा देशातील राजकारणात सर्वाधिक चर्चा होणारा मतदारसंघ आहे. अनेक वर्षं काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नागपूर लोकसभा मतदारसंघ २०१४ मध्ये भाजपकडे आला. नितीन गडकरी यांनी गेल्या वेळी नागपूरमधून जोरदार मताधिक्य मिळवले होते. नितीन गडकरीं विरोधात काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी गडकरींविरोधात लढण्यास अनुत्सुकता दाखवली होती.

पटोले आधी काँग्रेसमध्येच होते, नंतर ते भाजपमध्ये गेले आणि गेल्या वर्षी भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही म्हणत त्यांनी पक्षातून तसंच भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा दिला. देशभरातून मोदी सरकारविरोधात स्पष्ट नाराजी व्यक्त करत राजीनामा देणारे ते पहिले भाजप खासदार ठरले. नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध पटोले या यांच्या लढतीकडे देश लक्ष ठेवून असणार आहे.

Loading...
You might also like