‘पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतोय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि 1 एप्रिल) वर्धा येथे लोकसभा निवडणुकीसाठी पहिली सभा घेतली. यानंतर आता मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत. मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करण्यात आले आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतोय, गोंदियात संवाद साधेन असे ट्विट त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर टीकाही केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी ही गरिबहित विरोधी आघाडी आहे असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

वर्ध्यातील पहिल्या सभेनंतर आता बुधवारी (दि. 3 एप्रिल) मोदींची गोंदियात दुसरी सभा होणार आहे. ही जाहीर सभा भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ आहे. बालाघाट रोड टी पॉईंट, बायपास मार्ग परिसरातील अटलधाम मैदानावर ही सभा होणार आहे. 3 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता ही सभा पार पडणार आहे. दरम्यान 11 एप्रिल रोजी विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे मोदींनी पहिली सभा वर्धा येथे घेतली होती.

नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतोय ! गोंदिया येथे आज आपल्याशी संवाद साधेन ! काँग्रेस-राष्ट्रवादी ही गरिबहित-विरोधी आघाडी आहे. जनतेशी त्यांची कधीही बांधिलकी नव्हती, ना त्यांच्या नेत्यांची कधी जनतेशी नाळ जुळली. म्हणूनच आज महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे.” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे भाजप प्रभारी सरोज पांडे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, वर्धा येथे मोदींनी घेतलेल्या सभेत बोलताना मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. पवारांवर केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. आता आज (बुधवार दि 3 एप्रिल) गोंदियातील सभेत मोदी नेमकं काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.