वंचित बहुजन आघाडीची ही लढाई थेट मोदींशी : अ‍ॅड प्रकाश आंबेडकर

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीची ही लढाई थेट मोदींशी असल्याचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. परभणी लोकसभा मतदार संघातील पुर्णा व पाथरी येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्या प्रचारार्थ रविवारी पाथरी शहरातील जिल्हा प्रशाला मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते.

मोदी हे विसरले की, ही लोकशाही आहे मतदार हा राजा आहे, दुसरा राजा कुणीही नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मंचावर उमेदवार आलमगीर खान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉ.धर्मराज चव्हाण, एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड इम्तियाज खान, भारिपचे दादाराव पंडीत, मंचक हारकळ, कैलास पवार, आनंत कांबळे, मधुकर काळे मुजीब आलम, जुबेर खान, लाल सेनेचे गणपत भिसे, अ‍ॅड. अशोक पोटभरे, शेख गणी, अ‍ॅड. असेफ पटेल, युनूस हाश्मी, वाहेद अन्सारी, हामिद अतार, आदींसह पदाधिकारी, आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की अमेरिकेने दिलेली एफ-16 ही विमाने जशीच्या तशी आहेत असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे तर कोणते विमान पाडण्यात आले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला ? आमचं कोणी ऐकणार नाही हे या सरकारचे धोरण असल्याचे ते म्हणाले. जुन्या चलनातील नोटा बदलुन देऊ मात्र यावर टॅक्स भरावा लागेल, तसेच जीएसटी मध्ये अवश्यक असा बदल करण्याचे आश्वासन दिले. शेवटी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना निवडून देण्याचे आवाहन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. सभा व्यवस्थित पार पदवी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मंचक हारकळ यांनी अथक परिश्रम घेतले तर भारिपचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड अशोक पोटभरे यांनी आभार मानले