लोकसभा निकालावर विधानसभेची नांदी ; मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुखांची प्रतिष्ठ पणाला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या सहा महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीचे भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रचाराच्या निमित्ताने फडणवीस यांनी राज्य अक्षरश: पिंजून काढले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एखाद्या तरुण नेत्यालाही लाजवेल अशा प्रचंड उत्साहाने ही निवडणूक अंगावर घेतली. चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या
राजकारणावर पकड असलेल्या पवारांच्या पारड्यात महाराष्ट्रातील जनता काय टाकते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे या सर्वांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू शरद पवार हेच होते. त्यामुळे पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, नातू पार्थ अजित पवार यांचे अनुक्रमे बारामती व मावळमध्ये काय होणार, याबद्दल उत्सुकता आहे. गेल्या वेळी केवळ चार जागा जिंकता आलेल्या राष्ट्रवादीला यंदा राज्यात किती जागा मिळणार, सुनील तटकरे, उदयनराजे भोसले या राष्ट्रवादीच्या प्रमुख शिलेदारांचे भवितव्य काय आहे याचा फैसला काही तासात होणार आहे.

काँग्रेसने ही निवडणूक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविली. ऐन निवडणुकीत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी चिरंजीव सुजय यांच्यासाठी पक्षाविरुद्ध केलेली बंडखोरी, गडचिरोली-चिमुर मतदारसंघातील उमेदवार बदलावरून झालेला वाद, जागा वाटपाचा शेवटपर्यंत न संपलेला घोळ, पुणे आणि मुंबईतील उमदवार निश्चितीस झालेला विलंब या घडामोडींचा काय परिणाम झाला, हे आता समजणार आहे.