मुख्यमंत्र्यांना ‘ती’ घराणी कशी चालतात : रोहित पवार

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विखे आणि मोहितेचं घराणं कसं काय चालतं असा सवाल शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टाळ्या पिटणाऱ्या विखे आणि मोहिते पाटलांना त्यांच्या वडीलांनी आणि आजोबांनी केलेल्या कामाचा विसर पडलाय, असा टोला रोहित पवारांनी पक्षांतर केलेल्या विखे आणि मोहिते यांना लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील लोकसभा उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले रोहित पवार –

कोल्हापूरच्या सभेत मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या ७० वर्षात पश्चिम महाराष्ट्र खड्ड्यात घातला. तेव्हा मंचावर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवल्या. काहीजण खूप मनापासून टाळ्या वाजवत होते. पण ते टाळ्या वाजवणारे कोण होते ? विखे, मोहिते पाटील, निंबाळकर असे आघाडीतून तिकडे गेलेली मंडळी. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय होतो तर यांच्या आजोबांनी विकास केला नाही असंच झालं ना ? म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्र्याच्या भाषणावर टाळ्या पिटणाऱ्या विखे आणि मोहिते पाटलांना त्यांच्या वडीलांनी आणि आजोबांनी केलेल्या कामाचा विसर पडलाय. यांना मुख्यमंत्री काय बोलले हे कळलंच नाही.

व्यवसायात घराणेशाही चालते मग राजकारणात का नाही –

आता पार्थ कष्ट घेतोय, पण त्याच्यावर फक्त घराणेशाही असा आरोप केला जातोय. व्यवसायात घराणेशाही चालते मग राजकारणात का नाही चालत ? घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मला सांगा मुख्यमंत्र्यांना विखे घराणं, मोहिते घराणं कसं काय चालतं. असा खडा सवालही रोहित पवारांनी केला.