दुसर्‍या टप्प्‍यातील प्रचार तोफा थंडावल्या, ‘या’ आहेत रंगतदार लढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर लगेच दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तारीख तोंडावर येऊन ठेपली. राज्यात गुरुवारी (दि.१८) दहा मतदारसंघामध्ये लोकसभेचे मतदान होणार आहे. राज्यात काही ठिकाणी दुरंगी तर काही तिरंगी लक्षवेधी लढती पहायला मिळणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत.

महाराष्ट्रात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लढतीमध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघामधील काही मतदारसंघात प्रमुख लढती होणार आहेत. त्यामुळे दुसरा टप्पा महाराष्ट्रात चांगलाच गाजणार आहे.

सोलापूर मतदार संघामध्ये तिहेरी सामाना होणार आहे. या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सुशिलकुमार शिंदे, भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीकडून अॅड. प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २०१४ च्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार खासदार शरद बनसोडे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्याचा शिंदे यांना संधी आहे. मात्र शिंदे यांच्यापुढे आंबेडकरांचे तगडे आव्हान आहे. या तिहेरी सामन्यात कोण बाजी मारतो ते २३ मेला समजेल.

सोलापूर पाठोपाठ अकोल्यातही तिरंगी लढत पहायला मिळत आहे. याठिकाणी भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या तिघांमध्ये लढत होणार आहे. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन जागांवर निवडणूक लढवत आहेत. विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी २०१४ च्या निवडणूकीत काँग्रेसचे हिदायत पटेल यांचा पराभव केला होता. काँग्रेसने पटेल यांना यंदा पुन्हा संधी दिली असून ते या ठिकाणी विजयी होतात का हे पाहावे लागेल. कारण या ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

अमरावती मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ विरुद्ध युवा स्वाभिमान पार्टीच्या नवनीत राणा यांच्या सरळ लढत होणार आहे. नवनीत राणा यांची युवतींच्यमध्ये असणारी क्रेझ आनंदराव अडसूळ यांना तगडी टक्कर देईल का अशी चर्चा सध्या या मतदारसंघात आहे.

नांदेड हा अशोक चव्हाण यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. या ठिकाणी काँग्रेसचे अशोक चव्हाण विरुद्ध युतीचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात टक्कर होणार आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आपला पारंपारिक मतदारसंघ राखण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.

उस्मानाबाद मतदारसंघात दोन भावांमध्ये टक्कर पहायला मिळणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीकडून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांमध्ये असलेले वैर सर्वश्रृत आहे. त्यामुळे या ठिकाणी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात गाजत असलेल्या मतदारसंघापैकी एक बीड लोकसभा मतदारसंघ आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना नसून मुंडे विरुद्ध मुंडे असा बहिण भावाचा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना तर भाजपने प्रीतम मुंडे यांना मैदानात उतरवले आहे. बीडचा गड कोण जिंकणार या कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.