डॉ. सुजय विखेंच्या पराभवासाठी शरद पवार दि.२५ ला अहमदनगर दौऱ्यावर ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्राचा विचार करता अहमदनगर, माढा, बारामती, मावळ, शिरूर या मतदार संघात आगामी लोकसभा निवडणुकीत चुरस रंगणार आहे. यातही अहमदनगर मतदार संघांकडे विशेष लक्ष आहे. कारण सुजय विखे पाटील भाजप कडून या ठिकाणी उमेदवार आहेत तर राष्ट्रावादीकडून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदार संघाकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विशेष लक्ष आहे. अहमदनगरचा गड जिंकण्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार मास्टरप्लॅन आखत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असताना ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, यासाठी सुजय विखे यांनी बराच हट्टही केला होता. परंतु तसं करण्यास राष्ट्रवादीने नकार दिला. त्यानंतर नाराज सुजय यांनी थेट भाजपचाच झेंडा हातात घेत या मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.

शरद पवारांचा मास्टरप्लॅन

अहमदनगरची आगामी लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. एकीकडे भाजपने सुजय विखेंना उमेदवारी देवून राष्ट्रवादीसाठी आव्हान दिले आहे. तर सुजय विखे पाटील यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने चंग बांधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे २५ मार्च रोजी नगर दौऱ्यावर असणार आहेत. एवढेच नाही तर ते याठिकाणी मुक्काम देखील करणार आहेत अशी माहिती आहे. या दरम्यान शरद पवार अहमदनगरची जागा जिंकण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अहमदनगर येथे लोकसभेचा इतिहास पाहता, राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख हे नगर दक्षिणमधून २००४ मध्ये निवडून आले. पण २००९ नंतर राष्ट्रवादीचा या जागेवर कायम पराभव झाला. २००९ मध्ये शिवाजी कर्डिले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. भाजपच्या दिलीप गांधी यांनी त्यांचा पराभव केला. २०१४ मध्ये राजीव राजळे यांना राष्ट्रवादीने तिकिट दिलं होतं. दिलीप गांधी यांनी त्यांचाही पराभव केला. मात्र आता आगामी लोकसभा २०१९ मध्ये भाजप पुन्हा बाजी मारणार की राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन सक्सेसफुल होणार हे येणारा काळच ठरवेल.