माढात संजय शिंदे विरुद्ध रोहन देशमुख ?

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने माढा लोकसभेची उमेदवारी दिली आहे. शरद पवार यांच्या माघारी नंतर राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आज अखेर शरद पवार यांनी स्वतः संजय शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

संजय शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या विरोधात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांच्या नावाची चर्चा अधिक रंगू लागली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माढा मतदारसंघावरील राष्ट्रवादीची पकड अचानक ढिल्ली झाली आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार निकालावर प्रचंड प्रभाव पडणार आहे.

भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद कमावलेले संजय शिंदे राष्ट्रवादीचे उमेदवार झाल्याने भाजप त्यांना निवडणुकीत शह देण्यासाठी टपली आहे असे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे. तर काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा मतदारसंघात लढण्यास इच्छुक नाहीत असे सध्या बोलले जाते आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढण्याऐवजी त्यांना विधान परिषद अथवा राज्यसभेची अपेक्षा आहे.

रोहन देशमुख हे सुभाष देशमुख यांचे चिरंजीव आहेत तर संजय काकडे यांचे ते जावई आहेत. आपल्या जावयाला भाजपची उमेदवारी मिळत आहे म्हणून संजय काकडे यांनी भाजपाच्या विरोधात उपसलेली बंडाची तलवार मॅन केली आहे असे बोलले जाते आहे. तर लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्हचे चेअरमन असणारे रोहन देशमुख हे माढा मतदारसंघासाठी तगडे उमेदवार होण्याची शक्यता आहे.