बीड मधून प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात लढत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीकडून उमेदवार शोधण्यासाठी सुरू असणारी कसरत आज संपली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये बीड लोकसभा मतदार संघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. तर लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ. प्रीतम मुंडे याच निवडणूक लढवणार असल्याचे भाजपने घोषीत केले आहे.  त्यामुळे आता प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात लोकसभेची लढत रंगणार आहे.

केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून मंत्री पंकजा मुंडे यांनी चार वर्षांत विकासकामांसाठी मोठा निधी आणल्याचा दावा केला आहे. तीन दशकांपासून चर्चेत असलेला परळी-बीड-नगर या रेल्वेमार्गाच्या कामालाही मुंडे भगिनींनी गती दिल्याने सार्वजनिक विकासाच्या बळावर एकतर्फी विजय मिळवण्याचा आत्मविश्वास मुंडे भगिनींकडून जाहीरपणे व्यक्त केला आहे.  राष्ट्रवादीने बीडचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याने मुंडे विरुद्ध सोनवणे अशी लढत होणार आहे.

बजरंग सोनवणे यांची वर्षभरापूर्वी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती.  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि तत्कालिन प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी त्यावेळी सोनवणे यांच्या नावासाठी जोर धरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर,  आमदार अमरसिंह पंडित,  जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती.  दिग्गज नेत्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बजरंग सोनवणे यांच्या नावाची आज घोषणा केली.

गोपीनाथ मुंडे यांनी दोन वेळा मताधिक्याने विजय मिळवत मतदारसंघावर पकड मजबूत केली. दोन्ही निवडणुकांत मुंडे विरुद्ध पवार असा सामना रंगला आणि  स्थानिक पातळीवर ‘ओबीसी’ विरुद्ध ‘मराठा’ या ध्रुवीकरणात मुंडेंनी बाजी मारली. मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांची कन्या डॉ. प्रीतम  यांनी देशात मताधिक्याचा  विक्रम नोंदवला. मुंडे यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही, पण काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील यांना अडीच लाख मते मिळाली होती. या निवडणूकीमध्ये प्रितम मुंडे यांना ९ लाख २२ हजार ४१६ मते पडली होती. तर काँग्रेसचे  अशोकराव पाटील यांना २ लाख २६ हजार ९५ मते मिळाली होती. प्रितम मुंडे यांनी पाटील यांचा ६ लाख २८ हजार ९६२ मताधीक्याने पराभव केला होता.