‘त्या’ वक्तव्यामुळे सिद्धूंना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा गोत्यात आलेले माजी क्रिकेटर आणि पंजाब सरकारचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना वादग्रस्त विधान भोवले आहे. कटिहार येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी ‘लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विरुद्ध मतदान करा’, असं आवाहन मुस्लिमांना केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. ही प्रचारसभा १६ एप्रिल रोजी घेण्यात आली होती.

नक्की काय म्हणाले होते सिद्धू ?

तुम्ही अल्पसंख्यांक असूनही बहुसंख्य आहात. तुम्ही एकजूट दाखवली तर इथले उमेदवार तारिक अन्वर यांना कुणीही हरवू शकत नाही. तुमची संख्या इथे ६४ टक्के आहे. इथले मुस्लिम लोक हे आमची पगडी आहेत. तुम्हाला काही त्रास झाला तरी मला सांगा. मी पंजाबमध्येही तुम्हाला मदत करेन, असं आश्वासन सिद्धू यांनी दिले होते.

कटिहारमधल्या बलरामपूर विधानसभा क्षेत्रात बारसोईमध्ये सिद्धू यांनी हे भाषण केले होते. ‘ हे लोक मतांची विभागणी करून जिंकू पाहतात पण तुम्ही सगळे एकत्र आलात तर मोदींचा पराभव होईल. या निवडणुकीत षटकार मारा आणि मोदींना सीमेपार घालवा, असंही ते म्हणाले होते.

तारीक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून १९ वर्षांनी काँग्रेसमध्ये परतले. त्यानंतर ते कटिहारमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा हा मतदारसंघ पश्चिम बंगालला जोडलेला आहे. याच मतदारसंघातून ते पाच वेळा खासदार झाले आहेत. त्यांच्या काँग्रेसच्या उमेदवारीमुळे आणि प्रचारामुळे कटिहार मतदारसंघ चांगलाच गाजतो आहे.