लोकसभा निवडणूक : पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्यासाठी नवे नियम

मुबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून जारी केलेल्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील तीन वर्षे पूर्ण झालेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोलिसांना एक परिपत्रक पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, स्वतःच्या जिल्ह्यात नियुक्तीस असलेले आणि एका जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेर बदली करावी.

आयुक्तालयात गेल्या चार वर्षांत सलग तीन वर्षे काम करणारे, मूळ जिल्हा असणारे, मागिल निवडणुकीत कर्तव्यावर असणारे, फौजदारी गुन्हे असणारे यांची अकार्यकारी शाखेत बदली करावी, जे अकार्यकारी शाखेत सध्या कार्यरत आहेत त्यांना विधानसभा निवडणुका होईपर्यंत पुन्हा कार्यकारी विभागात काम देऊ नये; तसेच या अधिकाऱ्यांना निवडणुकीचे कोणतेही काम देऊ नये,’ असे या नव्या आदेशात म्हटले आहे.

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने पोलिस महासंचालक कार्यालयास पत्रव्यवहार करून निवडणुकींशी संबंध येणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
जे पोलीस अधिकारी चार वर्षापासून एकाच उपविभागात तीन वर्ष कार्य़काळ पूर्ण केला असेल आणि ते कार्यरत असतील अशा अधिकाऱ्यांची अकार्यकारी पदवर बदली करण्यात यावी.

तसेच अकार्यकारी पदावर नेमणूक शक्य नसेल तर, जिल्ह्याबाहेर नेमणूकीसाठी परिक्षेत्रिय विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे याचा प्रस्ताव पाठवण्यात यावे असे परिपत्राकात नमूद करण्यात आले आहे. जर अकार्यकारी पदावर असले तरी निवडणूक कामकाजाशी कोणत्याही प्रकारे किंवा अप्रत्यक्ष संबंध येईल अशा कोणत्याही प्रकारच्या कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवू नये.

निवडणुकीच्या अनुषंगाने बदल्या करताना परिक्षेत्रामध्येच बदली करता येते का, याकडे लक्ष द्यावे. मात्र, मूळ जिल्ह्यात नियुक्ती देऊ नये,’ असे महासंचालक कार्यालयाकडून विशेष पोलिस महानिरीक्षकांना सांगण्यात आले आहे.