‘अडवाणी आमचे प्रेरणास्थान आहेत ; वाढत्या वयामुळे त्यांना तिकीट दिलं नाही’ : नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाढत्या वयामुळे लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारी दिली नाही. असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काल भारतीय जनता पक्षाने आपली 184 उमेदावारांची यादी घोषित केली. त्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या जागी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी देत अडवाणींचा पत्ता केला आहे. त्यावर आता नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अडवाणींचे तिकीट कापले नसल्याचे सांगत नितीन गडकरी म्हणाले की, “अडवाणी यांचे तिकीट कापलेलं नाही, तर त्यांचे वाढते वय आणि तब्येतीच्या कारणांमुळे संसदीय बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. अडवाणी आमचे प्रेरणास्थान आहेत.” असे ते म्हणाले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, “अटलजी आणि आडवाणी आमचे प्रेरणास्रोत आहेत. कोणत्याही पक्षात परिवर्तन होते. याचा अर्थ तिकीट कापल्याचा संबंध त्यांच्या योगदानाशी होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल पक्षातील प्रत्येकाच्या मनात सन्मान आहे. नागपुरातून यावेळी 4 लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकू, नागपुरात आम्ही खूप कामं केली आहेत. मी नागपुरात वैयक्तिकरित्या 50 हजार लोकांना ओळखतो” असेही ते म्हणाले.

भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा समावेश आहे. याआधी गांधीनगरमधून लालकृष्ण अडवाणी लढत होते. आता अमित शहा हे गांधीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता अमित शहा यांच्या उमेदवारीने अडवाणींचा पत्ता कट झाला आहे. 1998 पासून गांधीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अडवाणी यांनी केले आहे. यावेळी आता अडवाणींऐवजी भाजपाने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे 91 वर्षीय अडवाणी यांना भाजपनं सक्तीची निवृत्ती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरु झाली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.