विखेंची आघाडी १,२५००० वर : कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर लोकसभा मतदारसंघातून अकराव्या फेरीअखेर भाजपचे डॉ. सुजय विखे यांची आघाडी तब्बल सव्वालाख मतांवर गेली आहे. त्यामुळे जवळपास निकालाचे चित्र स्पष्ट झाल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. त्यांचाच विजय होईल, अशी शक्यता असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

नगर लोकसभा मतदारसंघात जागेकडे संपूर्ण राज्यभराचे लक्ष लागले होते. अकराव्या फेरीअखेर भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांना 3 लाख 14 हजार 740 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना 1 लाख 98 हजार 438 मते मिळाली. अकराव्या फेरीअखेर विखे यांना तब्बल 1 लाख 24 हजार मतांची आघाडी मिळाली आहे.

मोठी आघाडी मिळाल्यामुळे विखे यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. अंतिम निकाल देण्यास वेळ असला, तरी मोठी आघाडी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण सुरू करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसला देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी स्वतः मतदारसंघात लक्ष घालून अनेक बैठका व सभा घेतल्या होत्या. विखेंचा पराभव करायचा, असा चंग बांधला होता. त्यामुळे ही जागा विखे-जगताप ऐवजी विखे-पवार अशी झाली होती. नगरची जागा अतिशय चुरशीपूर्ण वातावरणात पार पडल्यामुळे विखेंना धक्का बसू शकतो, असे सांगितले जात होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसून त्यांनी पहिल्या पासूनच आघाडी घेतली आहे.