५२ वर्षानंतर बारामतीत विजयानंतर ना ‘गुलाल’ उधळला ना ‘पेढे’ वाटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशाच्या राजकारणात मानाचे स्थान असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती ही जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. ज्येष्ठ नेते यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनादेखील राजकारणात वेगळे स्थान आहे. वेळोवेळी मिळविलेल्या राजकीय यशाने हे स्थान नेहमीच अधोरेखित झाले आहे. भाजपाने निवडणुकीदरम्यान केलेल्या वलग्ना खोट्या ठरवत बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी दणदणीत विजय मिळविला. तरीही बारामतीत विजयाचा जल्लोष झाला नाही़. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांचा मावळ मतदारसंघात दारुण पराभव झाला. या राजकीय भूकंपाने हे स्थान काही प्रमाणात डळमळले, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मोठ्या मताधिक्याच्या विजयानंतरदेखील केवळ पार्थ पवार यांच्या पराभवामुळे बारामतीत जल्लोष झालाच नाही. बारामतीकरांनी गेल्या ५२ वर्षांच्या राजकारणात प्रथमच विजयानंतरची शांतता अनुभवली. बारामती आणि राजकीय विजयाचे मोठे अतूट नाते आहे. आजपर्यंत हे नाते अबाधित होते. निवडणुकीआधीच गुलाल उधळण्याची, फटाक्यांच्या आतषबाजीची तयारी केली जात असे. राष्ट्रवादी काँग्रेस भवनापासून शहरातून विजयी मिरवणुकीचा जल्लोष बारामतीकरांनी नेहमीच अनुभवला आहे. पेढे भरवून विजयाचे जोरदार स्वागत केले जायचे.

भाजपाने वारंवार यंदा बारामतीत चमत्कार करुन दाखविणार अशी घोषणा केली होती. तसेच मतदान झाल्यानंतर शरद पवार यांनी जर बारामतीत वेगळे काही घडले तर ईव्हीएमवर प्रश्न उभा राहिल, असे सांगितले होते. त्याचा अर्थ बारामतीत बदल होण्याची शक्यता असल्याचा घेतला गेला. त्यामुळे मावळ आणि बारामतीविषयी प्रचंड उत्सुकता होती. आज सकाळी पुण्यात मतमोजणी सुुरू झाल्यानंतर मावळमध्ये पार्थ पवार सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते. त्यामुळे बारामतीकर लक्ष देऊन निकाल ऐकत होते. याचवेळी मतमोजणी सुरू झाल्यावर एका तासाने दुसऱ्या फेरीदरम्यान सुप्रिया सुळे सुमारे ८ हजार मतांनी पिछाडीवर असल्याची बातमी ‘फ्लॅश’ झाली. या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकता-चुकता राहिला. मात्र, अवघ्या दहा मिनिटांत चित्र बदलले. त्यांनतर खासदार सुळे यांच्या मताधिक्याचा आलेख विजय घोषित होईपर्यंत वाढताच होता. पण मावळमधील पराभवाने बारामतीत यंदा ना गुलाल उधळला गेला आणि नाही पेढे वाटले गेले. सुप्रिया सुळे यांच्या विजयाबरोबरच पार्थ पवार यांच्या तितक्याच दणदणीत पराभवामुळे पवार कुटुंबियात ‘कही खुशी कही गम’ असे चित्र दिसले.

You might also like