बीड लोकसभा : डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे विजयपथावर ; ५०,००० मतांनी आघाडीवर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बीड मतदार संघात डॉ. प्रीतम मुंडे यांनी यांची वाटचाल विजयापथावर आहे. आता फक्त विजयी घोषणेची औपचारिकता बाकी आहे. त्यांनी सातव्या फेरी अखेर ५०,००० मतांनी आघाडी घेतली आहे. बीड मतदार संघात भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत आहे. बीड लोकसभा मतदार संघात एकूण मतदार १८ लाख ८४ हजार ८६६ मतदार आहेत. त्यापैकी एकूण १३ लाख ४८ हजार ४७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदार संघात ६६. ०६ टक्के मतदान झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही बीड मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत २०१४च्या तुलनेत जवळपास तीन टक्क्याने घट झाली होती.

राजकीय पातळीवर प्रचंड संवेदनशील झालेल्या बीड मतदारसंघात भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे उमेदवार होते. मात्र खरी लढत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये होती. बीडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा नेहमीच संघर्ष होत राहिला आहे.

बीड मतदार संघात एकून ११ तालुके असून ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई, माजलगाव, आष्टी, केज, परळी या विधानसभा मतदारसंघांवर भाजपचं वर्चस्व आहे तर बीड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. सध्या राष्ट्रवादीचा एक तर इतर पाच भाजपचे आमदार आहेत. कधीकाळी इथे सर्वाधिक राष्ट्रवादीचे आमदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे बीड जिल्हाध्यक्ष आहेत. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना ९ लाख २२ हजार ४१६ मतं मिळाली. त्या ६ लाख ९६ हजार ३२१ मताधिक्य मिळवून निवडून आल्या होत्या.