माढ्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्याला ‘सुरुंग’ ; रणजितसिंह नाईक निंबाळकर ‘एवढ्या’ मतांनी विजयी

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – सुरुवातीपासूनच नाट्यमय घडामोडी घडत गेलेल्या या मतदार संघात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बाजी मारली. या मतदार संघात राष्ट्रवादीकडून संजय शिंदे, भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि वंचित बहूजन आघाडीकडून विजय मोरे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ७९,५७६ एवढया मतांनी विजयी झाले. त्यांना ५,७४,९५५एवढी मते मिळाली तर राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना ४,९५,३७६ इतकी मते मिळाली. माढा लोकसभा मतदार संघात एकूण १९ लाख ०४ हजार ८४५ मतदार आहेत. त्यापैकी १२,१०,९१५ मतदारांनी मतदान केले.

माढ्याचा नाट्यमय राजकीय प्रवास

माढा लोकसभा मतदार संघाची स्थापना २००८ साली करण्यात आली. यापूर्वी २००९ साली झालेल्या निवडणुकीत माढा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ साली हा विजय कायम ठेवत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली. अवघ्या २५००० मताधिक्याने त्यांचा विजय झाला होता. यंदाच्या निवडणुकांमध्ये सुरुवातीपासूनच या मतदार संघात नाट्यमय घडामोडी घडत गेल्या.

सुरुवातीला या मतदार संघातून शरद पवार लढणार होते मात्र त्यांनी माघार घेतल्यानंतर या मतदार संघातून राष्ट्रवादीकडून कुणाची वर्णी लागणार यासाठी उत्सुकता लागली होती. माढ्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आणि प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा चालू असताना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मात्र संजय शिंदे यांना देण्यात आली. या मधल्या काळात राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असणारे घराणे दुखावले गेले. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंग यांनी भाजपत प्रवेश केला. राष्टवादीला हा मोठा धक्का होता. त्यामुळे या नाराजीचे पडसाद यंदाच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे होती.

भाजपकडून आधीपासूनच प्रतिष्ठच्या ठरलेल्या माढा लोकसभा मतदार संघात तगडा उमेदवार द्यायचा होता त्यामुळे भाजपडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हा काँग्रेस आघाडीसाठी मोठा धक्का होता. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर माढ्याची उमेदवारी देखील देण्यात आली.

मात्र सुरुवातीपासूनच नाट्यमय घडामोडी घडलेल्या माढ्यात भाजपच्या यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर विजय मिळवला.

—————————————————–
माढा मतदार संघ
—————————————————–

एकूण मतदार – १९ लाख ०४ हजार ८४५

एकूण मतदान –१२,१०,९१५

विजयी उमेदवार — रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप )

मिळालेली मते – ५,७४,९५५