सुजय विखे यांची आघाडी अडीच लाखांवर ; विजयी घोषणेची औपचारिकता बाकी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपचे डॉ. सुजय विखे यांची आघाडी 2 लाख 46 हजार मतांवर गेली आहे. आता फक्त विजयी घोषणेची औपचारिकताच बाकी आहे. विखेच्या मतांची आघाडी अडीच लाखांवर पोहोचल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र परिसरातून काढता पाय घेण्यास सुरूवात केली. 

 भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांना  6 लाख 9 हजार 873 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना 3 लाख 63 हजार 359 मते मिळाली आहेत. विखे यांचे मताधिक्य वाढत गेल्यानंतर राष्ट्रवादीचे आ. जगताप समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या आवारातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे.

सुजय विखे यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण सुरू करण्यात आली आहे. नगरच्या जागेकडे संपूर्ण राज्यभराचे लक्ष लागले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसला देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मुलाच्या हट्टापायी राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेते पदही गमवावे लागले. भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी स्वतः मतदारसंघात लक्ष घालून अनेक बैठका व सभा घेतल्या होत्या. विखेंचा पराभव करायचा, असा चंग बांधला होता. त्यामुळे ही जागा विखे-जगताप ऐवजी विखे-पवार अशी झाली होती.