डाॅ. सुजय विखेंनी केला संग्राम जगतापांचा २ लाख ८१ हजार मतांनी पराभव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. त्यांनी विरोधी गटाच्या आ. संग्राम जगताप यांचा 2 लाख 81 हजार 474 मतांनी पराभव केला आहे. जगताप यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जिव्हारी लागला आहे.

भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांना 7 लाख 4 हजार 660 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना 4 लाख 23 हजार 186 मते मिळाली आहेत. विखे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. त्यामुळे मतांची आघाडी 1 लाखांच्या पुढे जाताच सुजय विखे यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण सुरू करण्यात आली आहे. नगरच्या जागेकडे संपूर्ण राज्यभराचे लक्ष लागले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यास राष्ट्रवादीने नकार दिला होता. त्यामुळे विखे यांनी भाजपात प्रवेश केला होता. मुलाच्या हट्टापायी राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेते पदही गमवावे लागले होते. भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी स्वतः मतदारसंघात लक्ष घालून अनेक बैठका व सभा घेतल्या होत्या. विखेंचा पराभव करायचा, असा चंग बांधला होता. त्यामुळे ही जागा विखे-जगताप ऐवजी विखे-पवार अशी झाली होती.

दुसरीकडे डॉ. सुजय विखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या होत्या. वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांना 31 हजार 807 मते मिळाली आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like