तुमकूर मतदारसंघातून माजी पंतप्रधान देवेगौडांचा पराभव ; भाजपचे जी.एस. बसवराज ‘एवढ्या’ मतांनी विजयी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कर्नाटकमधील तुमकूर मतदारसंघातुन निवडणूक लढवत असलेले देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा यांचा १३००० मतांनी पराभव झाला आहे.भाजपच्या जी.एस. बसवराज यांनी देवेगौडा यांचा पराभव केला. त्यांना पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागत आहे.

देवेगौडा यांनी त्यांचा हसन हा मतदारसंघ त्यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांना सोडला होता. त्यांनी तुमकूर या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. बसवराज आणि देवेगौडा यांच्यात येथे थेट लढत झाली. देवेगौडा आतापर्यंत सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून येत होते. २०१४ ला तुमकूर मतदारसंघातून काँग्रेसचे एस.पी. मुदाहनुमेगौडा निवडून आले होते. काँग्रेससोबत आघाडी केल्यावर हा मतदारसंघ जनता दल सेक्युलर कडे गेला होता. एच.डी. देवेगौडा यांचा पराभव हा जनता दल सेक्युलर पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बसवराज यांना ५ लाख ९६ हजार १२७ तर देवेगौडा यांना ५ लाख ८२ हजार ७८८ मते पडली आहेत. सुरवातीपासून बसवराजव यांनीच येथे आघाडी घेतली होती. शेवटपर्यंत ही आघाडी कायम राहिली.