साताऱ्यात उदयनराजेंचीच काॅलर ‘टाईट’ ; नरेंद्र पाटलांच्या मिशीचा पीळ ‘फिक्का’च ; उदयनराजे ‘एवढ्या’ मतांनी विजयी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली. या मतदार संघात राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले, शिवसेनेकडून नरेंद्र पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून सहदेव एवळे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले हे जवळपास १ लाख मतांनी विजयी झाले. त्यांना ५,४५,५९३ एवढी मते मिळाली तर शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांना ४,३५,६८१एवढी मते मिळाली. सातारा लोकसभा मतदार संघात एकूण १८ लाख ३८ हजार ९८७ मतदार आहेत. त्यापैकी ११,०९,४३४ मतदारांनी यंदा मतदान केले.

सातारा लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार उदयन राजे भोसले यांचीच चालती आहे हे पुन्हा सिद्ध झाले. पण त्यांना शिवसेनेच्या पाटील यांनी टफ फाईट दिली. साताऱ्यात उदयनराजे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला हमखास यश मिळवून देणारा मतदार संघ म्हणून सातारा मतदार संघाचे नाव आवर्जून घेतले जाते. यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या काळात कॉलर उडवण्याच्या खास शैलीमुळे उदयनराजे भोसले चर्चेत आले. साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यात ३६ चा आकडा आहे. मात्र लोकसभा निवडणुकांच्या काळात अनेकदा ते आमनेसामने, एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

उदयनराजे हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. उच्चशिक्षण घेतलेल्या उदयनराजे भोसले यांनी १९९० मध्ये राजकारणाची वाट धरली. १९९१ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडूण आले. १९९६ साली त्यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकून ते राज्यमंत्री झाले. १९९८-९९ च्या काळामध्ये ते राज्याचे महसूल राज्यमंत्री होते. भाजपला रामराम करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या तिकीटावर २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकित ते विजयी झाले. २०१८ मध्ये उदयनराजे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकीतही तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.

————————————————————————————————————————–
सातारा मतदार संघ
————————————————————————————————————————–

एकूण मतदार -१८ लाख ३८ हजार ९८७

एकूण मतदान –११,०९,४३४

विजयी उमेदवार –उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी )

मिळालेली मते – ५४५५९३