उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ओमराजे आघाडीवर ; राष्ट्रवादीला फटका

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ओमराजेंना आघाडी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राणाजगजितसिंह पाटील १९००० मतांनी पिछाडीवर आहेत. या आघाडीत सातत्य राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला हा फार मोठा धक्का मानला जाईल. विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात येऊन शिवसेनेकडून ओमराजेंना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी समोर आली होती. त्या गटबाजीचा कसलाही फटका शिवसेनेला बसत नसल्याचे दिसून येत आहे. दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होईल असे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवर मतदारांनी नाराजी दाखवल्याचे दिसून येत आहे. येथुन वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी मिळवलेल्या मतांचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसत आहे. राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे दोघंही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी राणा जगजितसिंह यांचा विजय झाला आणि ओमराजे पराभूत झाले होते. यावेळेस लोकसभेला मात्र हे चित्र पालटण्याची शक्यता आहे.