गिरीश बापट यांच्याकडून पुण्यातील सर्व ‘रेकाॅर्ड’ ब्रेक ; जाणून घ्या कोण-कोणते रेकाॅर्ड ब्रेक झाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा ३ लाख २४ हजार ६०८ मतांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळाविला आहे.

गिरीश बापट यांना ६ लाख ३२ हजार ८१५ मते मिळाली तर मोहन जोशी यांना ३ लाख ८ हजार २०७ मते मिळाली आहेत. मोहन जोशी यांना जेवढी मते मिळाली त्यापेक्षा अधिक मतांची आघाडी बापट यांनी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव ६४ हजार ७९३ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजप सलग दुसऱ्यांदा विजयी होत नाही, हा आजवरचा इतिहास गिरीश बापट यांच्या विजयाने मोडून पडला आहे. बापटांनी भक्कम मताधिक्यासह धमाकेदार विजयाची नोंद केली. तसेच पुणे महापालिकेतील नगरसेवक, विधासभेतील आमदार आणि संसदेतील खासदार या चढत्या क्रमाने लोकशाहीच्या तीन मंदिरांमध्ये निवडून जाण्याची किमया बापट यांनी साधली आहे.

आजवर कोणत्याच निवडणुकीत विजयी न झालेल्या मोहन जोशी यांच्या पदरी आणखी एका पराभवाची नोंद झाली. पुण्यातून सलग दोनदा हार पत्करण्याची नामुष्की काँग्रेसवर सन १९५२ पासून पहिल्यांदाच आली. यापूर्वीच्या सलग १६ निवडणुकांत पुणेकरांनी एकदाही काँग्रेसला सलग दोनदा नाकारले नव्हते. शिवाय २०१४ ची लोकसभा, विधानसभा, दोन वर्षांपूर्वीची महापालिका या पराभव मालिकेत चौथा पराभव नोंदला गेला.

गिरीश बापट यांना विजयामध्ये भाजपाची सर्व थरांत पोहोचलेली संघटनात्मक ताकद तसेच रा. स्व. संघाचे बळ, साधनांची उपलब्धता. हक्काचे मतदान करून घेण्यासाठी निर्माण केलेली बूथनिहाय रचनेने केलेले काम आणि मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदारांमध्ये उसळलेली सुप्त लाट त्याचबरोबर प्रतिस्पधी काँग्रेस उमेदवारांचा विस्कळीत प्रचार आणि बुथनिहाय रचनेची वानवा असणे आणि हे प्रमुख मुद्दे म्हणता येईल. पाच वर्षे पालकमंत्री म्हणून त्यांचा सातत्याने पुणे शहर व जिल्ह्यात संपर्क राहिला हाही मुद्दा महत्वाचा ठरला.

मोहन जोशी यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्यास खूप उशीर केला आहे. त्यामुळे त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयश आले. भाजपच्या तुलनेत प्रचारात सुसूत्रता नव्हती. मित्रपक्ष प्रचारात हिरिरीने सहभागी झाल्याचे दिसले नाही.

गेल्या ५ वर्षांत लोकसभा, विधानसभा, मनपा या सलग ३ निवडणुका हरल्याने पक्षात मरगळ. सुरेश कलमाडींच्या अस्तानंतर शहर काँग्रेसला आलेली निर्णायकी अवस्था बदललेली नाही. ‘गिरीश बापट यांचे मित्र’ या प्रचारामुळे जोशींची उमेदवारी पुणेकरांनी गांभिर्याने घेतली नाही. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गिरीश बापट यांना विजय सुकर झाला ही पहिली प्रतिक्रिया राजकीय कार्यकर्त्यांकडून जी उमटली होती. ती शेवटपर्यंत कायम राहिली व गिरीश बापट यांचा विक्रमी विजय झाला आहे. मध्यरात्री जिल्हाधिकारी राम नवल यांनी गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले.