सांगलीत ‘वंचित’मुळे ‘स्वाभिमानी’ विजयापासून ‘वंचित’ ; जाणून घ्या विधानसभा निहाय मतदान

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली लोकसभा मतदार संघात यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगली. सांगलीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्यात चुरस रंगली. खरी लढत ही खासदार संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यातच होती मात्र गोपीचंद पडळकर यांनी देखील चांगली मते मिळवली. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना ५,०३,६१५ मते मिळली तर स्वाभिमानी शेतकरी सांघटनेच्या विशाल पाटील यांना ३,४२,०१६ मते मिळली तसेच वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना २,९७,३४९ मते मिळाली. संजयकाका पाटील हे २,०६,२६६ मतांनी विजयी झाले. सांगली लोकसभा मतदार संघात एकूण १८ लाख ०३ हजार ०५४ मतदार आहेत. त्यापैकी ११,१७,३४४ मतदारांनी मतदान केले.

या मतदार संघात तिरंगी लढत होती. सांगली मतदार संघ हा १९८४ पासून काँग्रेसची सत्ता होती मात्र २०१४ साली भाजपचे संजयकाका पाटील यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि आता पुन्हा एकदा २०१९ सालीचा भाजपचीच सत्ता सांगलीत अबाधित राहिली. या मतदार संघात विशाल पाटील आणि संजयकाका पाटील त्यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र वंचितच्या गोपीचंद पडळकर यांनी देखील लक्षणीय मते मिळवली.

संजयकाकांच्या विजयाचा फॅक्टर

–सांगलीची जागा निवडून आणण्याकरिता भाजप -शिवसेना यांनी मिळून प्रयत्न केले होते. हे प्रयत्न खऱ्या अर्थाने फळाला आले असे म्हणावे लागेल. तसेच संजयकाका यांचा या भागात असलेला चांगला जनसंपर्क यंदाच्या निवडणुकीत कामी आला. तसेच अनुभवी प्रचारतंत्र आणि वर्षभरापासून केलेली मेहनत त्यामुळे संजयकाकांनी विजयश्री खेचून आणला.

–संजयकाका यांनी सिंचन योजना, महामार्ग आणि इतर विकासकामांसाठी केंद्रातून जिल्ह्यासाठी आणलेला निधी हा देखील त्यांच्या विजयात प्लस पॉईंट ठरला.

–संजयकाका यांनी केवळ भाजपच्या नेत्यांशी संबंध चांगले ठेवले नव्हते तर संजयकाका पाटील यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी देखील मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याचा फायदा संजयकाका पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळले.

… तर निकाल वेगळाच असता

सांगली लोकसभा मतदार संघाच्या तिरंगी लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना मिळलेली मते ही काँग्रेस महाआघडीची पारंपारिक मते असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. हा फॅक्टर विशाल पाटील यांच्या पराभवासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. याबरोबरच विशाल पाटील यांच्या बाबतीतील मुख्य बाब म्हणजे विशाल पाटील हे कारखानदार आहेत. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना ऊसाला भाव मिळवून देण्यासाठी कारखानदारांविरोधात लढले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत विशाल पाटील यांची उमेदवार म्हणून निवड केली ही बाब कदाचित शेतकऱ्यांना रुचली नसावी. जर विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली असती तर निकाल काही वेगळा असता असे तज्ञांचे मत आहे. सांगली मतदार संघात एकतर भाजप विरोधात उमेदवार उभा करण्यासाठी खूप विलंब झाला होता. तोपर्यंत भाजपचा प्रचार सांगलीच्या जनतेपर्यंत पोहचला होता. विशाल पाटील यांच्या पराभवामागे हे देखील एक कारण असू शकते. तसेच विशाल पाटील यांचे प्रचारतंत्र तितकेसे प्रभावी नव्हते. ही त्यांच्या पराभवाची मुख्य कारणे मानली जातात.
————————————-
विधानसभा निहाय आकडेवारी
————————————–
मतदारसंघ – संजयकाका पाटील – विशाल पाटील – गोपीचंद पडळकर

सांगली – ९२५४१ – ७१७०९ – ३२७८०

मिरज – ९१०४४ – ७३५५० – ३८५०६

पलूस कडेगाव – ६७८०९ – ७३११७ – ४०१६९

खानापूर – ७९१७९ –  ४३८२९ – ७८०४

तासगाव कवठेमहांकाळ – ९४९९२ – ४८०४३ – ५४७८७

जत – ७८०५० – ३१७६८ – ५३०८३