हातकणंगलेत राजू शेट्टी ‘आऊट’ ; धैर्यशील माने ९४,००० मतांनी विजयी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – हातकणंगले लोकसभा मतदार संघात यंदाची लढत ही चुरशीची ठरली. या मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विद्यमान खासदार राजू शेट्टी तर शिवसेनेकडून धैर्यशील माने यांच्यात प्रमुख लढत रंगली. २०१४ च्या निवडणुकीत भाजप सोबत लढून राजु शेट्टी यांनी खासदारकी मिळवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे धैर्यशील माने हे ९४,७१० एवढया मतांनी विजयी झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना ३,९४,१४६ एवढी मते मिळली तर शिवसेनेच्या धैर्यशाली माने यांना ४,८८,८५६ एवढी मते मिळाली. हातकणंगले लोकसभा मतदार संघात एकूण १७ लाख ७२ हजार ५६३ मतदार आहेत. त्यापैकी राज्यात सर्वाधिक १२,४५,७९७ मतदारांनी मतदान केले.

हातकणंगले मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. कारण हा संपूर्ण भाग साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानीला शेतकरी संघटनेचा मोठा प्रभाव पहायला मिळतो. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून आघाडीचे उमेदवार खा. राजू शेट्टी हे हॅट्ट्रिक करणार असल्याचे एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले मात्र मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच शिवसेनेचे धैर्यशील माने हे आघाडीवर होते. दुपारपर्यंत धैर्यशील माने ५०,००० मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर ते सतत आघाडीवरच राहिले. या मतदार संघात शेट्टींचे पारडे जड होते. मात्र तरुण नेतृत्व म्हणून धैर्यशील माने यांनी त्यांना तगडी टक्कर दिली आणि विजयी झाले.

धैर्यशील यांच्या आई निवेदिता माने या पूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार होत्या. गेल्या वर्षी धैर्यशील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एक तरुण नेतृत्व म्हणून धैर्यशील माने यांच्या नावाचा विचार केला जात आहे. धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यांच्या नावाचे प्रस्थ हातकणंगले आणि परिसरात आहे. त्यामुळे त्याचा फायदा धैर्यशील माने यांना निवडणुकीत झाला. २००९ साली निवेदिता माने राजू शेट्टींकडून पराभूत झाल्या होत्या मात्र आता २०१९ मध्ये धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांना पराभूत करून त्याचा बदला घेतल्याच्या प्रतिक्रिया माने समर्थकांनी दिल्या आहेत.

२०१४ साली राजु शेट्टी हे भाजप शिवसेना युतीकडून लढले होते. २०१४ ची निवडणूक जिंकल्यानंतर काही दिवसात त्यांचे केंद्रातील मोदी सरकारशी बिनसले. मोदी यांची धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा हल्लाबोल शेट्टी यांनी चालू केला. त्यामुळे भाजप सेनेच्या समर्थकांची मते ही शिवसेनेलाच मिळतील असे बोलले जात होते. २०१४ साली राजु शेट्टी यांना ६ लाख ३९ हजार १९१ मते मिळाली होती. १ लाख ७७हजार ८१० मताधिक्यांनी ते विजयी झाले होते.

हातकणंगले मतदार संघ

एकूण मतदार -१७ लाख ७२ हजार ५६३

एकूण मतदान –१२,४५,७९७

विजयी उमेदवार — धैर्यशील माने (शिवसेना)

मिळालेली मते- ४,८८,८५६

Loading...
You might also like