शिर्डीतून खा. लोखंडेंची १ लाख १९ हजारांची आघाडी ; विजयी घोषणेची औपचारिकता बाकी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांनी ईव्हीएम मशीनवर केलेल्या मतमोजणीत 1 लाख 19 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धक्का देणारा मानला जात आहे.

खा. लोखंडे यांना 4 लाख 83 हजार 449 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार आ. कांबळे यांना 3 लाख 64 हजार 113 मते मिळाली आहेत. खा. लोखंडे यांनी 1 लाख 19 हजार 336 मतांची आघाडी आहे. याच मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे रिंगणात होते. मात्र ते विशेष प्रभाव दाखवू शकले नाही. त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.

महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे यंत्रणा होती. तर कांबळे यांच्या बाजूने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात होते. लोखंडे यांच्या आघाडीमुळे थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी महिन्याभरातच पदाचा राजीनामा देऊन महायुतीच्या उमेदवारांना साथ दिली होती. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात काँग्रेस चांगलीच एकाकी पडली होती.

ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी पूर्ण झाली आहे. व्हीव्हीपँटवरील चिठ्ठ्यांची मोजणी पूर्ण होऊन अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

You might also like