युती न झाल्यास मंत्री उमेदवार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुका जसजशा जवळ येत आहेत राजकीय पक्षांच्या हालचालींंना वेग येताना दिसत आहे. त्यातही युतीबाबत प्रश्नचिन्ह कायम असतानाच भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून सहकारमंत्री सुभाष देशमुख, कल्याणमधून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असे समजत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने सध्या भाजपच्या संपर्कात असल्याचे समजत आहे. युती न झाल्यास निवडणुकीच्या तोंडावर कृपाल तुमाने आणि काही तळ्यात मळ्यात असणाऱ्या अन्य खासदारांना आपल्या पक्षात घेण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील ‘इलेक्‍टिव मेरिट’ असलेल्या वजनदार नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेचे तिकीट देण्याची रणनीती भाजपने आखली आहे.

आगामी लोकसभा निवडणुका घोषित होण्यास केवळ 3 आठवड्यांचा अवधी शिल्लक आहे. अशात निवडणुका तोंडावर असतानाही युतीबाबत प्रश्नचिन्ह कायम असून युतीला घेऊन कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. शिवसेनेच्या मनात नेमके काय आहे याचा काही केल्या थांगपत्ता लागत नाही. यामुळे आता भाजपाने मात्र स्वबळावर लढण्याची तयारी ठेवल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्वबळावर लढण्याचे भाष्य केले होते. विशेष म्हणजे लोकसभेच्या मैदानात जनतेला परिचित असलेले चेहरे देण्यावर भाजपचा भर असल्याचं समजत आहे.

१६ ते १८ ठिकाणी नवे उमेदवार
समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांना मुंबई दक्षिणमध्य आणि महादेव जानकर यांना बारामतीची जागा सोडून उर्वरित जागांवर प्रभावी उमेदवार देण्याचे भाजपने ठरवले आहे असे समजत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर लढावे लागल्यास विद्यमान खासदारांच्या जागा वगळता जवळपास १६ ते १८ ठिकाणी नवे उमेदवार द्यावे लागणार आहेत.