बिर्याणीवरून काँग्रेस समर्थकांमध्ये राडा ; ९ जण अटकेत

मुझफ्फरनगर : वृत्तसंस्था – निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानाची तारीख जवळ येईल तशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढवताना दिसत आहेत. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील बिजनौर लोकसभा मतदारसंघात एक मजेदार आणि विचार करायला लावणारी घटना घडली आहे.

काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत आखला. त्यानुसार बिर्याणीही दिली. मात्र बिर्य़ाणी खाण्यावरून समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

बिजनौर मतदारसंघातील काकरौली ठाण्याच्या हद्दीतील टडहेडा गावात माजी आमदार मौलाना जमीलयांच्या घरी प्रचार सभा आयोजित केली होती. प्रचार सभेनंतर दुपारी जेवण ठेवण्यात आले होते. समर्थकांना बिर्याणी देण्यात येणार होती. मात्र बिर्य़ाणी घेण्यावरून उपस्थित समर्थकांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवले. आचारसंहितेचे उल्लंघन आणि विविध कलमांखाली ३४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून ९ जणांना अटक करण्यात आली आहे.