रामटेक लोकसभा मतदारसंघ ; शिवसेनेच्या तुमाने यांची पुन्हा एकदा बाजी

 पोलीसनामा ऑनलाईन टीम –  रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने पुन्हा एकदा विजयी पताका फडकावण्याच्या वाटेवर आहेत. काँग्रेसचे किशोर गजभिये पराभवाच्या छायेत आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार तुमाने यांना ४६.८८% मते मिळाली आहेत तर काँग्रेसच्या गजभिये यांना ४१.८३% मते मिळाली आहेत. येथे शिवसेनेच्या कृपाल तुमाने विरुद्ध काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात थेट लढत होत आहे. रामटेकमध्ये बहुजन समाज पक्षाकडून सुभाष गजभिये मैदानात आहेत त्यांना . ३.८ % मते तर वंचित बहुजन आघाडीकडून किरण रोडगे रिंगणात आहेत, त्यांना .३.०९ % मते मिळाली आहेत.

गेल्यावेळेस कृपाल तुमाने यांनी काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा तब्बल १,७५,७९१ मतांनी पराभव करत काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्यामुळे यावेळेस कृपाल तुमाने यांनाच युतीकडुन उमेदवारी देण्यात आली. कृपाल तुमाने पुन्हा बाजी मारत शिवसेना प्रमुखांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. उमेदवारी देताना काँग्रेसमध्ये उडालेल्या गोंधळामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी पहायला मिळाला. त्या गटबाजीचा फटका काँग्रेसला बसल्याचे दिसून येत आहे.

२००९ मध्ये निवडून आल्यानंतर २०१४ मध्ये पराभूत झालेले मुकुल वासनिक यंदाही रामटेकमधून लढण्यास इच्छुक होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही तसा जोर लावला होता. पण काँग्रेसमधल्या इतर गटांचा विरोध पाहून स्वतः वासनिकांनीच आपली तलवार म्यान केली होती. मुकुल वासनिक यांना उमेदवारी न देण्यात आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले होते. कृपाल तुमाने मतदारांशी सातत्याने संपर्कात होते, त्याचा फायदा तुमाने यांना झाल्याचे दिसून येते.

किशोर गजभिये यांनी २०१८ मध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बसपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. १९८७ बॅचचे आएएस असलेले गजभिये यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये समाज कल्याण विभागात सचिव म्हणून काम केलं आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार – १९ लाख २१ हजार ०७४ मतदार आहेत. आहेत. त्यापैकी एकूण ११ लाख ९३ हजार ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . या मतदार संघात ६२.१२ % टक्के मतदान झाले.

रामटेक लोकसभा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे.