पाचव्या फेरीतच विखेंची 70 हजारांची आघाडी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अतिशय चुरशीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या नगर लोकसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांना 1 लाख 67 हजार 141 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना 98 हजार 185 मते मिळाली. पाचव्या फेरीतच त्यांना सुमारे 70 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसला देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी स्वतः मतदारसंघात लक्ष घालून अनेक बैठका व सभा घेतल्या होत्या. विखेंचा पराभव करायचा, असा चंग बांधला होता.

त्यामुळे ही जागा विखे-जगताप ऐवजी विखे-पवार अशी झाली होती. नगरची जागा अतिशय चुरशीपूर्ण वातावरणात पार पडल्यामुळे विखेंना धक्का बसू शकतो, असे सांगितले जात होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसून त्यांनी पहिल्या पासूनच आघाडी घेतली आहे. पाचवी फेरीअखेर त्यांना तब्बल 69 हजार मतांची आघाडी मिळाली आहे.. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता पसरली आहे.