रत्नागिरी – सिंधुदुर्गात शिवसेनेच्या विनायक राऊतांची विजयाकडे घोडदौड

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या लोकसभा मतदार संघात सध्या शिवसेनेचे विनायक राऊत १,०६,७२० मतांनी आघाडीवर आहेत. या मतदार संघात शिवसेनेकडून विनायक राऊत, काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर, वंचित बहूजन आघाडी कडून मारुती रामचंद्र जोशी, आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदार संघात १४ लाख ५४ हजार ५२५ मतदार आहेत . त्यापैकी ८९७२४९ मतदारांनी मतदान केले होते.

या मतदार संघात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. शिवसेनेचे विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून निलेश राणे या दोघांच्यातच मोठी चुरस होती. मात्र सध्या (दुपारी १:२४ वाजता ) हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिवसेनेचे विनायक राऊत १,०६,७२० मतांनी आघाडीवर आहेत.

विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार असून २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. राजापूरमध्ये येऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाला त्यांनी कडाडून विरोध केला. १९९९-२००४ मध्ये विनायक राऊत यांनी शिवसेनेकडून विधासभा निवडणूक लढली आणि ते विलेपार्ले येथून आमदार म्हणून निवडून आले. २०१२ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.

२७ मे २०१४ रोजी त्यांनी विधानसभेतील पदाचा राजीनामा दिला आणि ते शिवसेनेकडून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघातून उभे राहिले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे निलेश राणे यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता. आता निलेश राणे या मतदार संघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातील नाणार प्रकल्पाचा मुद्दा गाजला. त्यामुळे याचा फायदा थेट शिवसेनेला झाला अशी चर्चा आहे . शिवसेनेची सत्ता या मतदार संघातून उलथवून टाकण्यासाठी विरोधी पक्षाने जोरदार प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. यातच निलेश राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीचे जुने मुद्दे उखडून काढले. त्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण अखेर सध्या (दुपारी १:२४ वाजता ) हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिवसेनेचे विनायक राऊत १,०६,७२० मतांनी आघाडीवर आहेत.