Loksabha 2019 : अमित शहांना टक्कर देण्यासाठी मोदींचे गुरु रिंगणात ?

अहमदाबाद : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरात मधील गांधीनगर येथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या विरोधात कोण उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता या मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकीय गुरु शंकर सिंह वाघेला यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान हा मतदार संघ भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्णआडवाणी यांचा मानला जातो मात्र त्यांना यंदा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही.

शरद पवारांनी शब्द टाकला तर ….
गांधीनगर मधून शंकर सिंह वाघेला यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या गांधीनगर येथील पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे वाघेला यांनी १९८९ मध्ये भाजपला गांधीनगरमधून विजय मिळवून दिला होता. त्यानंतर वाघेला यांनी अडवाणींसाठी ही जागा सोडली होती. वाघेला यांनीच गांधीनगरमधून भाजपला पहिल्यांदा विजय मिळवून दिला होता. आता त्याच मतदारसंघातून ते भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अर्थात वाघेला यांनी याआधीच निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण स्थानिक नेत्यांच्या मते जर शरद पवारांनी शब्द टाकला तर वाघेला अमित शहा यांच्या विरोधात लढतील.

दरम्यान, गांधीनगर या मतदारसंघात ठाकोर समुदायाचे वर्चस्व आहे. येथील ७ विधानसभा मतदारसंघापैकी साणंद, कलोल आणि गांधीनगर उत्तर या ३ ठिकाणी ठाकोर समुदायाचे वर्चस्व आहे. गांधीनगरमधून जरी वाघेला यांच्या नावाची चर्चा असली तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता पवार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.