कुठे हिंसाचार तर कुठे EVM मध्ये बिघाड, पहिल्या टप्प्याचं पार पडलं मतदान

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान काही घटना वगळता शांततेत पार पडले. देशातल्या २० राज्यांमध्ये ९१ मतदारसंघामध्ये हे मतदान झाले. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात जागांवर आज मतदान झाले. कडक उन्हाळ्यामुळे दुपारी मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. सकाळी आणि दुपारनंतर गर्दी झाली. काही राज्यांमध्ये मतदान केंद्रावर EVMमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी फेरमतदानाची मागणीही केली होती.

विदर्भातल्या ७ मतदारसंघात नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरसह संवेदनशील गडचिरोलीचाही यामध्ये समावेश आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये नेहमीप्रमाणे ३ वाजेपर्यंतच मतदान संपवण्यात आलं. तर तिकडे जम्मू आणि काश्मीरमधील २ जागांसाठीही मतदान पार पडलं. मतदानासाठी खोऱ्यात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात तीन जवान जखमी झालेत. तर मतदान संपल्यावरही सुरक्षा पथकावर माओवाद्यांनी गोळीबार केला.

मतदानाची टक्केवारी
अंदमान आणि निकोबार बेट (१ जागा) – ७०.६७ %
आंध्र प्रदेश (२५ जागा) – ६६ %
चंदीगढ (१ जागा) – ५६ %
तलंगणा (१७ जागा) – ६० %
उत्तराखंड (५ जागा) ५७.८५ %
जम्मू-काश्मिर (२ जागा) – ५४.४९ %