Loksabha Result 2019 : महाराष्ट्रात ‘या’ डॉक्टरांचीच हवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत २०१४ पेक्षा २०१९ मध्ये मोदी लाट जास्त असल्याचे चित्र पहायला मिळाले. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांना जनतेने कौल दिलेला आहे. या निवडणुकीत डॉक्टरांची चांगलीच हवा पहायला मिळाली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या तिकीटांवर निवडणूक लढवणारे ‘डॉक्टर’ उमेदवार आघाडीवर आहेत तर काहींनी विजय मिळवला आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना अनपेक्षीतरित्या परभूत केले. निवडणुकीच्या काही दिवस आगोदर शिवसेनेला रामराम ठोकत डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने कोल्हे यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन शिवसेनचे आढळराव पाटील यांना कडवी टक्कर दिली. त्याचप्रमाणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात आलेल्या आणि काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांना भाजपाने उमेदवारी दिली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीत डॉ. सुजय विखे यांनी विजय मिळवला.

बीडच्या विद्यमान खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी देखील आघाडी घेतली आहे. त्यांच्यासह नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार डॉ. हिना गावित यांनी विजय मिळवला. डॉक्टर उमेदवारांच्या या यादीत माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा देखील समावेश आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. भामरे विजयी झाले आहेत. तसेच कल्याण मधील शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे देखील विजयी झाले आहेत.